दिनांक-22 मार्च 2024
मराठी माध्यमांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा :-
एकीकडे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांच्या शाळेबाहेर रांगा लागत असताना मराठी शाळांकडे मात्र अनेक पालक नाक मुरडताना दिसतात. भविष्यातील स्पर्धेसाठी आपलं मूल तयार व्हावं यासाठी अनेकजण इंग्रजी शाळांमध्येच मुलांना शिकवण्याकडे प्राधान्य देताना दिसतात. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री यांनी मराठी माध्यमांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
पालकांच्या इंग्रजी शिकण्याच्या हट्टापायी मराठी शाळा ओस पडत असताना वर्षा गायकवाड यांनी आता मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाईल असं सांगितलं आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकं तयार असतील अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
“अनेक आमदारांनी सीबीएसई, आसीयएसईचा अभ्यासक्रम असा आहे सांगितलं. मी एक गोष्ट नम्रपणे सांगू इच्छिते की, आपलं एक बोर्ड असून त्याचंही अस्तित्व आहे. त्याचा अभ्यासक्रम कसा चांगला करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिलीचा अभ्यासक्रम बदल आहोत आणि आदर्श शाळा आहेत तिथे दुसरीचा अभ्यासक्रम बदलत आहोत,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेत चांगलं कळतं. पण त्याचसोबत त्या शब्दाला इंग्रजी शब्द काय आहे हे माहिती असावं म्हणून आम्ही हे करत आहोत. पुस्तकांचं ओझं होणार नाही याचं आपण तंतोतंत पालन करत आहोत. त्यामुळे आपण सध्या राज्याच पहिलीसाठी एकत्रित आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तकं आणत आहोत”.
‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर :-
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठय़ा आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून यावेळी पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर केला जाणार आहे.
‘आयपीएल’चे प्रसारण करणारी वाहिनी स्टार स्पोर्टसचा तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिकाधिक भर असून सामन्यांदरम्यान समालोचकांना संघांविषयी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी यंदा ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानवाचा (रोबो स्टॅटिस्टीक्स) वापर केला जाईल. याबाबतची माहिती डिस्ने स्टारच्या क्रीडा विभागाचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी दिली.
‘‘आम्ही ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानव तयार केला आहे. तो समालोचकांचे साहाय्य करेल. आमच्या समालोचकांना विराट कोहली ‘आयपीएल’मध्ये एखाद्या प्रकारच्या चेंडूवर किती वेळा बाद झाला आहे, याची माहिती पाहिजे असल्यास ते ‘क्रिको’ला याबाबत विचारू शकतील. तो ३० सेकंदात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.
तसेच यंदा पहिल्यांदाच सर्व ७४ सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन केले जाईल. संदीप पाटील, अमोल मुझुमदार, स्नेहल प्रधान आणि विनोद कांबळी यांसह अन्य काही जण समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. यंदाच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने महाराष्ट्रात होणार आहेत.
- जागतिक जलसंकट आणि पाण्याचे महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो.
- गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी, पाण्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शाश्वत विकास ध्येय 6:
- 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता साध्य करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
- 1992 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला.
- पहिला जागतिक जल दिन 1993 मध्ये साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment